अंबरनाथ (प्रतिनिधी): अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर विठ्ठल उर्फ दादासाहेबनलावडे यांचे त्यांच्या पुणे येथील राहत्या घरी वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा प्रशांत, १ मुलगी, २ सुना, व नातवंडे असा परिवार आहे. पुणे येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादांचे ज्येष्ठ चिरंजीव बाबा यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. १९७४ ते १९७८ या काळात दादासाहेब नलावडे हे अंबरनाथचे नगराध्यक्ष होते. त्या पूर्वी ते रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे अध्यक्ष होते. अनेक वर्षे त्यांनी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ख्याती होती. नगराध्यक्ष पदाच्या पोट निवडणुकीत थेट जनतेमधून प्रचंड बहुमताने ते निवडून आले होते. चार वर्षांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी भरीव विकास कामे केली होती. पूर्व आणि पश्चिम असे दोनही भाग त्यांनी विकसित केले होते. त्यांच्याच काळात पालिकेची प्रशासकीय इमारत, पूर्व व पश्चिमेला मनोरंजन केंद्र, शिवमंदिराजवळ डॉरमेन्टरी, वेपेटेरिया, पूर्वेला यशवंतराव चव्हाण खुले नाट्यगृह तर पश्चिमेला मदनसिंग मनवीरसिंग खुले नाट्यगृह, सर्वत्र चांगल्या दर्जाचे डांबरी रस्ते अशी अनेक कामे झाली होती. आजही अंबरनाथ शहरात दादासाहेब नलावडे यांच्या कारकिर्दीची चर्चा होत असते. दादासाहेब नलावडे यांच्या निधनाचे वृत्त कळताच शहरातून शोक व्यक्त होत आहे. मुरबाड चे आमदार किसन कथोरे, स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, भारतीय जनता पक्षाचे विभागीय उपाध्यक्ष किसनराव तारमळे, माजी नगराध्यक्षा सौ. पूर्णिमा कबरेराष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सदाशिव पाटीलमनसेचे अध्यक्ष कुणाल भोईरन लेबर फ्रंट चे अध्यक्ष श्याम गायकवाड आदींनी शोक केला आहे
प्रभाकर विठ्ठल उर्फ दादासाहेबनलावडे यांचे निधन
• गिरीश त्रिवेदी