अंबरनाथ (प्रतिनिधी): देशासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी राज्य शासनाच्या उपजिल्हा रुग्णालय असलेल्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयाला भेट देत येथील आपत्कालीन व्यवस्थे संदर्भात आढावा घेतला. यावेळी आपत्कालीन व्यवस्थे दरम्यान वैधकीय अधिकारी, रुग्णसेविका आणि रुग्णवाहिका तसेच आवश्यक असलेली वैद्यकीय साधन सामग्री याचाही आढावा घेण्यात आला. यादरम्यान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी रुग्णालयामध्ये तयार करण्यात आलेल्या अलगीकरण व विलगीकरण कक्षातील रुग्णांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. या संदर्भातील आवश्यक ती सावधानता व सतर्कता बाळगण्याची गरज असून त्याअनुषंगाने कार्यवाही करण्याच्या सूचना उपस्थित अधिकायांना यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिल्या. खाजगी रुग्णालया प्रमाणे सरकारी दवाखान्यातील डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ यांना देखील यावेळी सेफ्टी किट म्हणून गाऊन, कॅप व मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच डॉ. बी . जी. छाया रुग्णालयामार्फत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या तयारी संदर्भात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, शिवकृपा हॉस्पिटलचे डॉ. गणेश राठोड, मख्याधिकारी देवीदास पव वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत दोडे आणि संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते.
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली छाया रुग्णालयाची पाहणी