अंबरनाथ (प्रतिनिधी): ठाणे जिल्हासह राज्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बाधित रुग्णांची तपासणी करण्याकरिता आवश्यक अशा लॅब्स उपलब्ध असल्याने त्यात तपासणीसाठी परवानगी देण्यात यावी अशी लेखी मागणी आमदारडॉ. बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून या संसर्ग रुग्णांची तपासणी करून निदान करण्याकरिता ठाणे जिल्ह्यात खासगी लॅब्स सोडल्यास दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्याचे आमदार डॉ. बालाजी किणीकरांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून अनेकजण कस्तुरबा रुग्णालयात तपासणीकरिता जाण्यासाठी देखील घाबरत आहेत. ज्या खासगी लॅब्समध्ये तपासणी करण्यात येत आहे त्यांच्याकडून रु. ४५००/इतकी फी आकारण्यात येत आहे. गोरगरीब नागरिकांना ती फी परवडणारी नसल्याने अनेकजण तपासणी करण्याचे टाळत आहेतही चिंतेची बाब असल्याचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. ठाणे जिल्हासह राज्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना बाधित रुग्णांची तपासणी करण्याकरिता आवश्यक अशा लॅब्स उपलब्ध असल्याने याठिकाणी कमी फी आकारून तपासणी करण्याकरिता परवानगी देण्यात आल्यास सोयीचे होऊन बाधित रुग्णांवर प्रतिबंधात्मक उपाय करणे शक्य होऊ शकेल असे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना तपासणीचे आदेश द्यावेत
• गिरीश त्रिवेदी